गिरिप्रेमी या भारतातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेच्या ‘पी क्यूब माउंट मेरू’ या आगामी महत्वाकांक्षी मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते भारताचा तिरंगा मोहिमेचे नेते उमेश झिरपे व त्यांच्या संघ सदस्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बेलराइज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक व स्पोर्ट्सइंडीच्या संस्थापक सुप्रिया बडवे व पी क्यूब’चे व्यवस्थापकीय संचालक पार्थ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गिरिप्रेमीचे संस्थापक आनंद पाळंदे, संस्थापिका उषःप्रभा पागे व संस्थेचे अध्यक्ष जयंत तुळपुळे हे देखील उपस्थित होते. येत्या ११ मे रोजी मोहिमेचा संघ रवाना होणार आहे. ६६६० मीटर उंच शिखराच्या नैऋत्य धारेने ही चढाई होणार असून या मार्गाने या आधी भारतीय मोहीम आयोजित केलेली नाही. त्यामुळे शिखर चढाई यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल.

या आधी गिरिप्रेमीने जगातील १४ पैकी आठ अष्टहजारी शिखरांना गवसणी घातली आहे. यात एव्हरेस्ट, कांचनजुंगा, अन्नपूर्णा यांसारख्या खडतर शिखरांचा समावेश आहे. सोबतच माउंट मंदा या भारतीय हिमालयातील शिखरावर देखील यशस्वी मोहीम करण्यात गिरिप्रेमीला यश आले आहे. या सर्व मोहिमांचे नेतृत्व उमेश झिरपे यांनी केले असून माउंट मेरू मोहिमेचे नेतृत्व देखील झिरपे हेच करणार आहेत.

माउंट मेरू संघामध्ये अनुभवी व नव्या दमाच्या गिर्यारोहकांचा मिलाफ आहे. हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंगचे माजी उपप्राचार्य, एअरफोर्स ऍडव्हेंचर विंगचे प्रमुख विंग कमांडर देवीदत्त पंडा, पाच अष्टहजारी शिखरांना गवसणी घालणारा आशिष माने, अन्नपूर्णा, कांचनजुंगा, च्यो ओयू सारख्या शिखरांवर चढाई करणारा डॉ. सुमित मांदळे, एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी करणारा कृष्णा ढोकले, कांचनजुंगा, अमा दब्लम, माउंट मंदा शिखरांवर तिरंगा फडकविणारा विवेक शिवदे, माउंट मंदावर यशस्वी चढाई करणारा पवन हडोळे व निष्णात प्रस्तरारोहक व नवोदित गिर्यारोहक वरुण भागवत हे गिर्यारोहक माउंट मेरू शिखरावर चढाई करतील. सपोर्ट टीममध्ये अखिल काटकर याचा समावेश आहे.